
कारण तुम्ही अजूनही देहस्वभावाचे [अध्यात्मिक नसलेले, सामान्य वासनांच्या नियंत्रणाखाली असलेले] आहात. कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये मत्सर, द्वेष, भांडण आणि गटबाजी आहे, तोपर्यंत तुम्ही अध्यात्मिक नसलेले व देहस्वभावाचे नाही का, जे मानवी मापदंडाप्रमाणे आणि केवळ (अपरिवर्तित) मनुष्यांप्रमाणे वागत आहेत?
आजच्या शास्त्रवचनात पौल शिकवतो की, जर आपण भावना आणि संवेदना यांसारख्या सामान्य मानवी प्रेरणांच्या नियंत्रणात असू, तर आपण अध्यात्मिक नाही. तुमच्या भावना तुमच्या नियंत्रणात आहेत की त्या तुमच्यावर नियंत्रण ठेवतात? भावना चंचल आणि सतत बदलणाऱ्या असतात, आणि म्हणूनच त्या अविश्वसनीय असतात. माझा विश्वास आहे की, शत्रू ख्रिस्ती लोकांना त्रास देण्याचा आणि त्यांच्या मार्गात अडथळा आणण्याचा सर्वात प्रमुख मार्ग म्हणजे आपल्या भावना.
आपल्याला कसे वाटते यावर आपण नेहमीच नियंत्रण ठेवू शकत नाही, परंतु आपण काय करतो यावर नियंत्रण ठेवू शकतो. परिपक्व ख्रिस्ती लोक भावनांच्या आहारी जात नाहीत; ते देवाच्या वचनानुसार आपले आचरण ठरवतात. आपल्या भावनांना आपले विचार आणि शब्द चालना देतात, म्हणून जर आपल्याला आपल्या भावनांऐवजी आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार चालायचे असेल, तर आपण काय विचार करतो आणि काय बोलतो याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एखादी गोष्ट करण्याची इच्छा नाही म्हणून योग्य गोष्ट बदलत नाही. जे लोक आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व असतात ते आपल्या भावनांच्या पलीकडे जाऊन जगतात आणि त्यांना कसेही वाटले तरी देवाची इच्छा पूर्ण करतात.
पौल विशेषतः मत्सर आणि गटबाजी (मतभेद किंवा भांडण) यांचा उल्लेख अध्यात्मिक परिपक्वतेच्या अभावाची लक्षणे म्हणून करतो. या बाबतीत देवाला तुमची मदत मागा. तुमच्याजवळ जे आहे त्यात समाधानी राहा, इतरांचा मत्सर करू नका, कारण योग्य वेळी देव तुम्हाला अधिक देईल हे जाणून घ्या. सर्व लोकांसोबत शांतीने राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करा.
हे प्रभू, मला माझ्या भावनांच्या आहारी न जाण्यास मदत कर. मला तुझ्या वचनाचे पालन करायला, माझ्या कृतींवर नियंत्रण ठेवायला आणि भावनांऐवजी सत्यानुसार जगायला शिकव, आमेन.