
धन्य (आनंदी, ज्यांचा हेवा वाटावा असे) आहेत ते लोक, जे न्यायाचे पालन करतात [इतरांशी न्याय्य वागतात], जे योग्य आचरण करतात आणि जे सदैव देवाच्या दृष्टीने योग्य स्थितीत असतात.
आयुष्यातील अनेक संकटे ही इतरांच्या वागण्यामुळे ओढवतात. दुसऱ्याचे अपयश, निष्काळजीपणा, अज्ञान किंवा पाप यांचा आपल्यावर परिणाम होतो आणि साहजिकच, त्या व्यक्तीमध्ये बदल घडावा अशी आपण देवाला प्रार्थना करतो.
इतरांनी बदलावं आणि आपल्याशी चांगलं वागावं असं आपल्याला वाटत असलं, तरी मला एक गोष्ट उमजली आहे: इतरांच्या वागण्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा, मी त्यांच्याशी कसं वागतो यावर लक्ष केंद्रित करणं अधिक हिताचं आहे. कधीकधी, लोकांच्या ज्या गोष्टींमुळे आपल्याला चीड येते, त्यांचाच वापर देव आपल्याला बदलण्यासाठी करतो. तो आपल्याला अधिक सहनशील व संयमी बनवतो आणि निस्वार्थपणे प्रेम करण्यास समर्थ करतो.
लोकांसाठी प्रार्थना कराच, पण स्वतःसाठीही प्रार्थना करायला विसरू नका; जेणेकरून त्यांच्या उणिवांकडे पाहताना तुमची प्रतिक्रिया तशीच असेल जशी देवाला अपेक्षित आहे.
हे प्रभू, ज्या लोकांच्या वागण्यामुळे मला खूप त्रास होतो किंवा चिडचिड होते, त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी आणि परिस्थिती काहीही असली तरी त्यांना तुझे प्रेम दाखवण्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे. मार्गदर्शनासाठी तुझ्याकडे पाहण्यास, संयमाने व सौजन्याने वागण्यास आणि तुला अपेक्षित आहे तशा प्रकारे इतरांशी वागण्यास मला मदत कर. आमेन.