
जेव्हा मला भीती वाटते, तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. ज्याच्या वचनाची मी स्तुती करतो त्या देवावर—मी विश्वास ठेवतो आणि मला भीती वाटत नाही. सामान्य माणसे माझे काय करू शकतात?
स्तोत्र ५६ ची सुरुवात दावीद देवाला आर्ततेने हाक मारण्याने होते, कारण त्याचे शत्रू त्याचा “जोरात पाठलाग करत आहेत” आणि दिवसभर ते हल्ला करत राहतात (वचन १). अशा दबावाखाली असताना, दावीद देवाला घोषित करतो: जेव्हा मला भीती वाटते, तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. लक्षात घ्या की तो “जेव्हा मला भीती वाटते” असे म्हणतो, “जर मला भीती वाटली तर” असे नाही. यावरून मला कळते की, भीती ही एक मानवी भावना आहे हे दावीद स्वीकारतो; आपण सर्वजण कधी ना कधी, काही प्रमाणात भीती अनुभवतो. पण तो पुढे म्हणतो, “मी तुझ्यावर विश्वास ठेवतो.” त्याने स्वतःवर किंवा इतर लोकांवर विश्वास ठेवला नाही; त्याने केवळ देवावर विश्वास ठेवला. दावीद धैर्याने आणि शौर्याने जगला कारण त्याला माहीत होते की देव नेहमी त्याच्यासोबत आहे. आपणही याच प्रकारे जगू शकतो. आपण आपल्याला वाटणाऱ्या भीतीनुसार न जगता, देवाच्या वचनानुसार जगण्याचा पर्याय निवडू शकतो.
वर्षानुपूर्वी, देवाने मला माझ्या जीवनातील भीतीवर मात करण्यासाठी ज्याला मी “शक्तीची जुळी मुले” म्हणतो, त्यांचा वापर करायला शिकवले. ती म्हणजे “मी प्रार्थना करतो” आणि “मी म्हणतो.” जेव्हा मला भीती वाटते, तेव्हा मी प्रार्थना करायला आणि देवाकडे मदत मागायला सुरुवात करतो; तेव्हा मी म्हणतो, “मी घाबरणार नाही!” मी तुम्हालाही प्रोत्साहित करतो की, कोणत्याही गोष्टीबद्दल भीती वाटताच तुम्ही या शक्तीशाली जुळ्यांचा वापर करा. यामुळे भीतीला तुमच्यावर नियंत्रण मिळवू देण्याऐवजी, तुम्हाला त्या भावनेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
हे प्रभू, जेव्हा मला भीती वाटते, तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. मी तुझ्या मदतीसाठी प्रार्थना करीन आणि घोषित करीन, “मी घाबरणार नाही!”