
परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तू आपला देश, आपले नातेवाईक आणि आपल्या वडिलांचे घर सोडून, मी तुला दाखवलेल्या देशात जा.”
जर देवाने तुम्हाला तुमचे घर, तुमचे कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या व आरामदायक असलेल्या सर्व गोष्टी सोडून, कोठेही जाण्यास सांगितले, तर तुम्हाला कसे वाटेल?
अब्रामासमोर हेच आव्हान होते आणि त्यामुळे तो घाबरला होता. पण देव त्याला सतत सांगत होता, “भिऊ नकोस.” जेव्हा देवाने यहोशवाला इस्राएल लोकांना वचन दिलेल्या भूमीत घेऊन जाण्यासाठी बोलावले, तेव्हा देवाने त्यालाही हाच संदेश दिला होता.
तुम्ही कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी, तुमची भीती नाहीशी होण्याची वाट पाहू इच्छिता, पण जर तुम्ही असे केले, तर तुम्ही देवासाठी फारच कमी कार्य पूर्ण करू शकाल. देवाने त्यांना जे करण्यास सांगितले होते, ते करण्यासाठी अब्राम आणि यहोशवाला विश्वासाने आणि आज्ञाधारकतेने पाऊल उचलावे लागले आणि त्यांना ते भीतीनेच करावे लागले. त्यांच्या मनात “भीतीची भावना” असूनही त्यांनी “विश्वासाची पावले” उचलली.
देवाला तुमच्याकडून जे काम करून घ्यायचे आहे, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हालाही हेच करावे लागेल. पण तो तुमच्यासोबत असेल आणि म्हणेल, “भिऊ नकोस.”
देवा, मला भीती वाटत असतानाही विश्वासाने पाऊल उचलण्यास मदत कर. मी तुझ्या उपस्थितीवर, तुझ्या मार्गदर्शनावर आणि तुझ्या वचनांवर विश्वास ठेवतो आणि तुझी आज्ञा पाळतो, आमेन.