
“परमेश्वर तुझा देव, साहाय्य करणार्या वीरासारखा तुझ्या ठायी आहे; तो तुझ्याविषयी आनंदोत्सव करील; त्याचे प्रेम स्थिर राहील, तुझ्याविषयी त्याला उल्लास वाटून तो गाईल.”
माझ्या मते, आजच्या काळातील लोकांसमोर असलेली सर्वात मोठी समस्या म्हणजे आपली धावपळीची, घाईगडबडीची आणि तणावपूर्ण जीवनशैली. अतिव्यस्ततेमुळे देवाचे ऐकणे खूप कठीण होते, परंतु आजचे वचन असे आश्वासन देते की देव आपल्या प्रेमाद्वारे आपल्याला शांत करेल. स्वतःसाठी तुम्ही करू शकणाऱ्या सर्वोत्तम गोष्टींपैकी एक म्हणजे अशी जागा शोधणे, जिथे तुम्ही शांत आणि स्थिर राहू शकाल. देवाचे ऐकण्यासाठी एकांत आणि शांततेच्या क्षणांची आवश्यकता असते.
जर तुम्हाला खरोखरच देवाचा तो सूक्ष्म, मंद आवाज ऐकायचा असेल, तर तुम्हाला स्वतःला शांत करावे लागेल. तुम्हाला अशा ठिकाणी जावे लागेल जिथे तुम्ही देवासोबत एकटे असू शकाल. येशूने म्हटले आहे, “…तू आपल्या खोलीत जा, दरवाजा बंद कर आणि गुप्त ठिकाणी असलेल्या तुझ्या पित्याला प्रार्थना कर; मग गुप्त गोष्टी पाहणारा तुझा पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल.” (मत्तय ६:६). शांततेचे काही क्षण कदाचित पुरेसे नसतील; देवाला शोधण्यासाठी तुम्हाला दीर्घकाळ शांत राहण्याचीही गरज पडू शकते.
कोणत्याही व्यत्ययाशिवाय किंवा अडथळ्याशिवाय देवाच्या सहवासात वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही देवासोबत एकटे असता, तेव्हा आपल्या समस्यांचा विचार करू नका. त्याऐवजी, देवाकडे त्याचे ज्ञान आणि सामर्थ्य मागा. स्वतःच्या आत्म्याचे नूतनीकरण आणि ताजेपणा मिळवण्यासाठी प्रार्थना करा. देवाला सांगा की, तुमच्या आयुष्यासाठी त्याची काय योजना आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे. त्याने तुम्हाला काय करावे आणि काय करू नये, हे विचारून घ्या. स्वतःला देवाच्या समोर सादर करा आणि त्याचे ऐकून घ्या. देवाकडे जाऊन तुम्ही त्याचा सन्मान करत असता. तुम्हाला त्याच्याकडून नक्कीच उत्तर मिळेल. जर त्याच्यासोबतच्या एकांतवासात तुम्हाला त्याचा आवाज ऐकू आला नाही, तरी काळजी करू नका. तुम्ही त्याला शोधून तुमचे कर्तव्य पूर्ण केले आहे; आता आयुष्याच्या प्रवासात तोच तुम्हाला मार्गदर्शन करेल.
हे पित्या, मी आता स्वतःला तुझ्यासमोर सादर करतो. माझ्या हृदयाला शांत कर, माझ्या मनाला स्थिर कर आणि मला तुझ्या प्रेमात विसावू दे. माझ्याशी बोल आणि मला ऐकण्यासाठी कान दे, आमेन.