हळूहळू आणि सातत्याने

हळूहळू आणि सातत्याने

“उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात; जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.”

माझे पती अत्यंत संयमी आहेत, तर माझ्या स्वभावात गोष्टी घाईघाईने पूर्ण करण्याची प्रवृत्ती आहे. ते अनेक वर्षांपासून म्हणतात, “घाई केली तर गोष्ट ठिसूळ (कमकुवत) राहते; सावकाश केले तर ती भक्कम बनते.” घाई केल्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपण असे काही बोलून बसतो जे नंतर न बोलले असते तर बरे झाले असते असे वाटते; आपण अशी वचने देतो जी पाळणे कठीण जाते; आणि आपण अशा वस्तू विकत घेतो ज्यांचे पैसे भरताना नंतर आपल्याला पश्चात्ताप होतो. घाई करणारी व्यक्ती शेवटी काही मिळवण्याऐवजी गमावूनच बसते.

सुदैवाने, देव आपल्या बाबतीत अत्यंत संयमी आहे आणि तो कधीही आपल्याकडून आशा सोडून देत नाही. संयम हे पवित्र आत्म्याचे फळ आहे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये वास करत असल्यामुळे आपल्याकडे हा संयम असतो, परंतु तो विकसित करण्यासाठी आणि अधिक बळकट करण्यासाठी आपल्याला त्याचा सराव करणे आवश्यक आहे. आपण विश्वास आणि संयमाद्वारे देवाच्या अभिवचनांचे वारसदार बनतो (इब्री लोकांस पत्र ६:१२). जसजशी वर्षे उलटत गेली, तसतसा माझ्यामध्ये संयम वाढत गेला आहे, कारण अनुभवातून मी शिकले आहे की, अधीर झाल्यामुळे देव घाई करत नाही. देवाची वेळ अगदी अचूक असते; आपण त्या वेळेची वाट पाहायला शिकले पाहिजे आणि वाट पाहताना आपल्या आयुष्याचा आनंदही घेतला पाहिजे.

सध्या तुम्ही कशाची वाट पाहत आहात? ती गोष्ट काहीही असो, देव तुमचे हृदय पाहतो. जर ती गोष्ट तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल, तर देव ती तुम्हाला अगदी योग्य वेळी नक्कीच देईल.

हे पित्या, माझ्या बाबतीत तू दाखवलेल्या संयमाबद्दल मी तुझी आभारी आहे. घाई करण्याऐवजी मला संयम राखायला शिकव, अशी मी विनंती करते. येशूच्या नावात, आमेन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *