
हे परमेश्वरा, दाविदाप्रीत्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर. त्याने परमेश्वराजवळ शपथ वाहिली, याकोबाच्या समर्थ देवाला नवस केला की, “मी आपल्या राहण्याच्या तंबूत जाणार नाही, आपल्या अंथरुणावर पडणार नाही; मी आपल्या डोळ्यांवर झोप, आपल्या पापण्यांवर सुस्ती येऊ देणार नाही; परमेश्वरासाठी स्थान, याकोबाच्या समर्थ देवासाठी निवासमंडप मिळवीपर्यंत मी असेच करीन.”
दाविदाची अशी तीव्र इच्छा होती की, त्याने एक असे घर बांधावे ज्यात देव निवास करेल. परंतु, देवाने त्याला ते घर बांधण्याची परवानगी दिली नाही. त्याऐवजी, ते घर बांधण्याची जबाबदारी दाविदाचा मुलगा शलमोन याच्याकडे सोपवण्यात आली. आज आपल्याला देवाच्या निवासासाठी घरे बांधण्याची गरज नाही, कारण विश्वासणारे लोक हेच देवाचे घर आहेत. १ करिंथकर ६:१९-२० मध्ये म्हटले आहे: “तुम्हाला माहीत नाही का की, तुमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, जो तुमच्यामध्ये आहे आणि जो तुम्हाला देवाकडून मिळाला आहे? तुम्ही स्वतःचे मालक नाही; तुम्हाला एका किमतीने विकत घेण्यात आले आहे. म्हणून, आपल्या शरीराद्वारे देवाचा गौरव करा.”
जेव्हा मी या गोष्टीचा विचार करतो की, देव पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला स्वतःचे मंदिर किंवा निवासस्थान म्हणून निवडतो, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटते. तो आपल्यामध्ये राहतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो; तो आपल्याला सत्य शिकवतो, पापाची जाणीव करून देतो आणि नीतिमत्त्वाविषयी खात्री देतो (योहान १४:१७, १६:७-१५). जर आपण आपल्यातील पवित्र आत्म्याचे ऐकले आणि त्याच्या आज्ञा पाळल्या, तर आपले जीवन सामर्थ्यवान आणि आनंददायी बनेेल.
आपले शरीर देवाचे मंदिर असल्यामुळे, आपण स्वतःची चांगली काळजी घेतली पाहिजे, योग्य आहार घेणे, व्यायाम करणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि शारीरिक आरोग्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणे आवश्यक आहे. देवाला आपल्याद्वारे खूप काही घडवून आणायचे आहे, आणि आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की तो कधीही आपल्यापासून दूर नसतो. तो आपल्यासोबत आहे आणि आपल्यामध्येही आहे, आपल्या आयुष्याच्या प्रत्येक दिवशी तो आपल्यासोबत असतो.
हे पित्या, पवित्र आत्म्याद्वारे तू माझ्यामध्ये राहतोस, त्याबद्दल तुझे आभार. स्वतःची चांगली काळजी घेऊन मी तुझा गौरव करू शकेन, असे मला साहाय्य कर. मला तुझे मार्गदर्शन पाळायचे आहे आणि माझ्याद्वारे तू जे कार्य करू इच्छितोस, त्यात तुला सहकार्य करायचे आहे. आमेन