
तुमचे कार्य काहीही असो, ते मनापासून (जीवापासून) करा, जणू काही ते माणसांसाठी नव्हे, तर प्रभूसाठी करत आहात.
आपल्याला कंटाळवाणे जीवन जगण्यासाठी कधीच निर्माण केले गेले नाही. देवाने आपल्यामध्ये साहसाची ओढ निर्माण केली आहे, आणि साहस म्हणजे असे काहीतरी करून पाहणे जे आपण यापूर्वी कधीही केलेले नाही. जर तुम्हाला साहसी व्हायचे असेल, तर तुम्हाला काहीतरी नवीन करण्यासाठी पुढे पाऊल टाकावे लागेल. जीवनाच्या बाजूला बसून धाडसी लोकांना रोमांचक जीवन जगताना पाहू नका, त्यांच्यात सामील व्हा. तुमच्या ‘सुरक्षिततेच्या नावेतून’ बाहेर पडा आणि पेत्राप्रमाणे तुम्ही पाण्यावर चालू शकता का ते पाहा (मत्तय १४:२६-३१).
मी तुम्हाला खात्री देतो, जर तुम्ही तुमच्यासाठी असलेल्या देवाच्या इच्छेनुसार पाऊल टाकत असाल, तर तो तुम्हाला यशस्वी होण्यास सक्षम करेल. तुम्हाला सक्षम वाटण्याची गरज नाही, आणि तुमच्याकडे अनुभव असण्याचीही गरज नाही. तुम्हाला फक्त देवाची आज्ञा पाळण्याची इच्छा, कृतज्ञतेची वृत्ती आणि विश्वासाने भरलेले हृदय यांची गरज आहे. देव क्षमता शोधत नाही; तो उपलब्धता शोधत आहे. तो अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो म्हणेल, “देवा, मी येथे आहे, मला पाठव. मी येथे आहे, माझा उपयोग कर. देवा, मला तुझी सेवा करायची आहे. तू माझ्याकडून जे काही करून घेऊ इच्छितोस, ते सर्व मला करायचे आहे.”
हे पित्या, मी एक अद्भुत आणि साहसाने भरलेले जीवन जगावे अशी तुझी इच्छा आहे, यासाठी मी आभारी आहे. तू माझ्याकडून जे काही करून घेऊ इच्छितोस, ते तू स्पष्ट करशील अशी मी प्रार्थना करतो. तू माझ्या मार्गात पाठवत असलेल्या संधींबद्दल आणि त्यांचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी देत असलेल्या धैर्याबद्दल मी तुझे आभार मानतो.