
हे प्रभू, माझी सर्व इच्छा तुझ्यासमोर आहे आणि माझा सुस्कारा तुझ्यापासून लपलेला नाही.
देव त्याच्या वचनात सांगतो की, जर आपण आपला आनंद त्याच्यामध्ये मानला, तर तो आपल्याला आपल्या हृदयातील गुप्त इच्छा आणि विनंत्या पूर्ण करून देईल (स्तोत्रसंहिता ३७:४). मला ही योजना आवडते कारण स्वतःसाठी हव्या असलेल्या गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात मी अनेक वर्षे निराशेत घालवली होती. गोष्टी मिळवण्याच्या या प्रक्रियेत, आपण अनेकदा देवाला शोधण्यात आणि त्याला जाणून घेण्यात आनंद मानण्यास कमी पडतो. अनेक वर्षांपूर्वी, सेवाकार्यात सहभागी होण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे माझ्या बाबतीतही असेच घडले होते. मला वाटायचे की देवासाठी सेवा करणे ही जगातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, पण मला हे शिकण्याची गरज होती की ती गोष्ट खुद्द देवाइतकी महत्त्वाची नव्हती.
तुम्ही तुमच्या इच्छांमध्ये समतोल राखत आहात का आणि इतर कशापेक्षाही अधिक देवामध्ये आनंद मानत आहात का? तसे नसेल, तर खरोखर काय महत्त्वाचे आहे याची स्वतःला आठवण करून देऊन तुम्ही सहजपणे यात बदल करू शकता. आजच्या वचनात सांगितल्याप्रमाणे तुमच्या सर्व इच्छा देवापुढे मांडा आणि तुमच्यासाठी जी त्याची परिपूर्ण इच्छा नाही, अशा गोष्टी तो दूर करेल यावर विश्वास ठेवा.
प्रत्येक इच्छा देवाकडून आलेली नसते आणि म्हणूनच आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार नाहीत; परंतु ज्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत त्या पूर्ण होतील, यावर आपण देवावर विश्वास ठेवू शकतो. देवाला तुम्हाला हे सांगायचे आहे की, जर तुम्ही एखादी गोष्ट मागितली आणि ती तुम्हाला मिळाली नाही, तर कदाचित त्याने तुमच्यासाठी त्याहूनही काहीतरी अधिक चांगले योजलेले असू शकते. म्हणून निश्चिंत राहा; देवामध्ये आनंद माना; आणि बाकी गोष्टींची काळजी त्याला घेऊ द्या.
देवा, मला इतर कशापेक्षाही अधिक तुझ्यामध्ये आनंद मानण्यास मदत कर. मला तुझ्या वेळेवर, तुझ्या योजनांवर आणि माझ्या आयुष्यासाठी जे खरोखर सर्वोत्तम आहे त्यावर विश्वास ठेवायला शिकव. आमेन.